पोस्ट ऑफिसच्या या 8 बचत योजना बँकेपेक्षा जास्त व्याज देतात
पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात, विशेषतः जर तुम्ही महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असाल.
चला तर मग, भारतीय टपाल खात्याच्या प्रमुख बचत योजनांवर एक नजर टाकूया.
1. राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना
राष्ट्रीय बचत मुदत ठेव योजना ही बँकांमधील मुदत ठेव योजनेसारखीच आहे. ही योजना बँकांमध्ये ‘फिक्स डिपॉझिट’ आणि पोस्ट ऑफिसमध्ये ‘टाईम डिपॉझिट’ म्हणून ओळखली जाते.
तुम्ही या योजनेत किमान एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी पैसे गुंतवू शकता.
किमान एक वर्षासाठी 6.9% व्याज आणि 5 वर्षांच्या कमाल मुदत ठेवीसाठी 7.5% व्याज मिळतं.
2. राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना
राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते ही बचत योजना मासिक व्याज देते.
एखाद्या व्यक्तीला या योजनेत जास्तीत जास्त 9 लाखांची गुंतवणूक करता येते ज्यावर 7.4% व्याज देण्यात येते. संयुक्त खाते असल्यास तुम्ही 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे.
तुम्हाला या योजनेतून लवकर बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला पहिल्या वर्षामध्ये पैसे काढता येत नाहीत. तुम्ही एक वर्षानंतर किंवा तीन वर्षापूर्वी खाते बंद केल्यास, तुमच्या गुंतवणुकीतील 2% कपात केली जाईल.
जर तुम्ही तीन वर्षांनी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर 1% कपात केली जाईल. शेवटी, या योजनेत तुम्हाला मिळालेल्या व्याजाच्या तुलनेत गुंतवणुकीतून वजा केलेली रक्कम कमी असेल.
जर तुम्ही या योजनेत 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 5 वर्षांत एकूण 37,000 रुपये व्याज मिळेल.
म्हणजेच, या योजनेची जास्तीत जास्त गुंतवणूक 15 लाख रुपये असल्यास, तुम्हाला व्याज म्हणून शेवटी 5,55,000 रुपये मिळतील. ही योजना करमुक्त नाही.
3. ज्येष्ठ नागरिक बचत योजना
60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बचत योजना आहे.
निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना 55 वर्षांनंतर आणि निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांना 50 वर्षांनंतर या योजनेचा लाभ घेता येतो.
पोस्टाच्या बचत योजनांमध्ये या योजनेवर सर्वाधिक व्याजदर आहे. या योजनेचा व्याजदर 8.2% आहे.
या योजनेत कमीत कमी 1000 रूपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रूपये गुंतवता येतात. बचत खात्यात दर तीन महिन्यांनी एकदा व्याज जमा केले जाते.
5 वर्षांच्या कार्यकाळासह, तुम्ही पहिल्या वर्षात योजनेतून बाहेर पडल्यास कोणतेही व्याज दिले जाणार नाही. मागील तिमाहीचे व्याज जर बचत खात्यात जमा केले गेले असेल तर गुंतवणुकीच्या रकमेतून ते वजा केले जाईल.
जर तुम्हाला एक वर्षानंतर किंवा 2 वर्षापूर्वी पैसे काढायचे असतील तर गुंतवणुकीच्या रकमेपैकी 1.5% कपात केली जाईल. त्यानंतर खाते बंद केल्यावर 1% वजावट आकारली जाईल.
4. महिला सन्मान बचत योजना (महिला सन्मान पत्र)
महिलांना बचत करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पोस्ट ऑफिसची ही एक विशेष योजना आहे. या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा आहे आणि दर वर्षी 7.5% व्याज देण्यात येते.
पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे उपलब्ध इतर योजनांच्या तुलनेत, ही योजना अल्प-मुदतीच्या बचतीसाठी जास्त व्याज देते.
तुम्ही किमान रूपये 1000 ते 2,00,000 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
