महाराष्ट्र क्रीडा विभागाची सुधारित रोख पारितोषिक योजना; ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याला ५ कोटी
महाराष्ट्र क्रीडा विभागाच्या सुधारित रोख पारितोषिक योजनेत ऑलिम्पिकसह आशियाई, राष्ट्रकुल, राष्ट्रीय आणि विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पुरस्कारांची तरतूद करण्यात आली आहे. पात्र खेळाडूंसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि क्रीडा संघटनांसाठी १५ दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा विभागाने सुधारित रोख पारितोषिक योजना अधिक व्यापक आणि खेळाडूकेंद्रित करण्यावर भर दिला आहे. पात्रता, पारितोषिकाची रक्कम, सांघिक खेळ, मार्गदर्शकांचे योगदान आणि अर्जाची प्रक्रिया याबाबत योजनेत स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत.
सुधारित योजनेनुसार महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असलेले आणि पात्र स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू रोख पारितोषिकासाठी पात्र ठरतील. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूला ५ कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला ३ कोटी रुपये, तर कांस्यपदक विजेत्याला २ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्णपदकासाठी १ कोटी, रौप्यपदकासाठी ७५ लाख आणि कांस्यपदकासाठी ५० लाख रुपये पारितोषिक निश्चित करण्यात आले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकासाठी अनुक्रमे ७ लाख, ५ लाख आणि ३ लाख रुपये देण्यात येतील.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, विश्वचषक, आशियाई अजिंक्यपद, वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स तसेच पॅरा, डेफ, अंध, विशेष ऑलिम्पिक आणि कनिष्ठ व युवा स्तरावरील पात्र स्पर्धांसाठीही स्वतंत्र रोख पारितोषिकाची तरतूद करण्यात आली आहे.
सांघिक खेळांसाठी स्वतंत्र सूत्र
सांघिक खेळांमध्ये पारितोषिकाची गणना संघातील खेळाडूंच्या संख्येनुसार केली जाणार आहे. यासाठी संबंधित वैयक्तिक पारितोषिकाच्या १.५ पट ते ५ पटपर्यंत एकूण पारितोषिक निश्चित करण्याची तरतूद आहे.
खेळाडूंच्या यशामध्ये मार्गदर्शकांची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यासाठीही पारितोषिकाची तरतूद करण्यात आली आहे. खेळाडूला मिळणाऱ्या पारितोषिकाच्या एकूण १० टक्के रक्कम मार्गदर्शकांना देण्यात येईल. या रकमेचे Grassroot ३० टक्के, Developmental ३० टक्के आणि Elite ४० टक्के अशा सूत्रानुसार वाटप केले जाणार आहे.
बॅडमिंटन, टेनिस आणि हॉकीसाठी विशेष तरतूद
बॅडमिंटन, टेनिस आणि हॉकी या खेळांसाठी विशेष पारितोषिकांची स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. टेनिसमधील चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या विजेत्याला ३ कोटी रुपये, तर उपविजेत्याला २ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
पात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या कालावधीनुसारही पारितोषिकाची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. चार वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेसाठी निर्धारित रकमेच्या १०० टक्के, दोन वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेसाठी ५० टक्के आणि वार्षिक स्पर्धेसाठी २५ टक्के रक्कम लागू राहील.
ऑनलाइन अर्ज आणि १५ दिवसांची मुदत
पात्र खेळाडूंना रोख पारितोषिक मिळविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. संबंधित क्रीडा संघटनेने आंतरराष्ट्रीय पदकाची माहिती आणि आवश्यक प्रमाणपत्रे पदक मिळाल्यानंतर १५ दिवसांच्या आत संचालनालयाकडे सादर करणे अपेक्षित आहे.
सुधारित योजनेमुळे विविध स्तरांवरील खेळाडूंना पारितोषिकाच्या निकषांची स्पष्ट माहिती मिळण्यास मदत होणार असून, अर्ज आणि प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेलाही अधिक शिस्तबद्ध स्वरूप मिळण्याची अपेक्षा आहे.
