महाराष्ट्रात यंदा डिप्लोमा शिक्षण क्षेत्राला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रथम वर्ष डिप्लोमा साठी तब्बल 1.57 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही आकडेवारी राज्यातील तांत्रिक शिक्षण विभागासाठी (DTE) आणि डिप्लोमा कॉलेजसाठी निश्चितच समाधानकारक आहे.
विशेष म्हणजे, यंदा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल पारंपरिक ११ वी ज्युनियर कॉलेजच्या ऐवजी डिप्लोमा कोर्सकडे वाढताना दिसतो आहे. यामागे अनेक सकारात्मक कारणे आहेत – उद्योगांची वाढती मागणी, तांत्रिक कौशल्यांना मिळणारे महत्त्व, आणि अल्पावधीत रोजगाराच्या संधी यामुळे डिप्लोमा कोर्स हा विद्यार्थ्यांसाठी आकर्षक पर्याय ठरत आहे.
तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे अधिकारी सांगतात की, “डिप्लोमा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घेतलेली मोठी उत्सुकता ही डिप्लोमा शिक्षण संस्थांच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे आणि सरकारच्या योजनांचे फळ आहे. सर्व डिप्लोमा महाविद्यालयांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्टार्टअप्ससाठी प्रोत्साहन आणि उद्योगांशी संलग्नता वाढवण्यासाठी केलेली मेहनत यामुळेच हा सकारात्मक बदल दिसत आहे.”
डिप्लोमा कॉलेजेसकडून विद्यार्थ्यांना आधुनिक प्रयोगशाळा, इनक्युबेशन सेंटर्स, आणि करिअर गाईडन्स यांसारख्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही डिप्लोमा शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी पुढे येत आहेत.
सध्याच्या आकडेवारीनुसार, डिप्लोमा कोर्समुळे विद्यार्थी ११ वी नंतर थेट करिअरला दिशा देणारे तांत्रिक ज्ञान मिळवू शकतात आणि अल्पावधीत रोजगारक्षम होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा विश्वास आहे की, हा ट्रेंड पुढील काही वर्षांत आणखी मजबूत होईल.
Average Rating