दहावी नंतरचा करिअर निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. हा निर्णय घेताना फक्त पारंपरिक पर्यायांवर अवलंबून न राहता, सध्याच्या आणि भविष्यातील संधींचा विचार करणे आवश्यक आहे. योग्य अभ्यास, जागतिक घडामोडींची समज आणि विद्यार्थ्याच्या आवडी-क्षमतांचा विचार करूनच पुढील वाटचाल ठरवणे योग्य ठरेल.
तंत्रशिक्षणाची वाढती गरज
दहावीनंतर अनेक शैक्षणिक पर्याय उपलब्ध आहेत, परंतु सध्याच्या तांत्रिक युगात तंत्रशिक्षणाची निवड ही प्रगतीची वाट ठरू शकते. टेक्नॉलॉजीच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे आता मेडिकल, फायनान्स, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या क्षेत्रांतही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे भविष्यातील संधी साधायच्या असतील, तर तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे अनिवार्य ठरणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरण आणि तंत्रज्ञानाचा महत्त्व
नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० नुसार, विद्यार्थ्यांना केवळ पारंपरिक ज्ञान पुरेसं ठरणार नाही, तर त्यासोबत तंत्रज्ञानाचं सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे. याचाच एक भाग म्हणून आता ६ वी पासूनच कोडिंग आणि प्रोग्रामिंग यांसारखे विषय शिकवले जात आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की तंत्रज्ञान आणि तंत्रशिक्षण हाच यशाचा मूलमंत्र ठरणार आहे.
तंत्रशिक्षणामुळे करिअर संधी
तंत्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनेक क्षेत्रांचे दरवाजे उघडतात. यामध्ये स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकऱ्या, तसेच संरक्षण क्षेत्रातील आर्मी, नेव्ही आणि इस्रो (ISRO) यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये संधी निर्माण होतात. याशिवाय, खासगी कंपन्यांमध्ये सुद्धा तंत्रज्ञानाधारित नोकऱ्यांना मोठी मागणी आहे.
करिअर निवडताना काय विचार करावा?
विद्यार्थी आणि पालकांनी करिअर निवडताना खालील बाबींचा अभ्यास करणे आवश्यक आहे:
✔ विद्यार्थ्याच्या आवडी आणि क्षमतांचा विचार करावा.
✔ सध्याच्या आणि भविष्यातील जॉब मार्केट ट्रेंड समजून घ्यावा.
✔ तंत्रशिक्षणासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि कम्युनिकेशन स्किल्स विकसित कराव्यात.
✔ संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच योग्य शैक्षणिक शाखा निवडावी.
दहावीनंतर करिअर निवडताना पारंपरिक विचारांना बाजूला ठेवून, नवीन युगाच्या मागणीनुसार तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणाचा स्वीकार करणे अधिक फायदेशीर ठरेल. भविष्यातील स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञानासोबत मैत्री करणे आणि सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे.
– एस. आर. नदाफ (लेक्चरर इन इंग्लिश)
Average Rating